comment 2 Comments
Posted on Last updated

लोकनेते अण्णासाहेब वर्तक

माझ्या संबंध आयुष्यात वाईट वाटण्यासारखे काही घडले आहे का? शेवटपर्यंत मी सर्वांची सेवा करु शकलो. ह्यातच माझ्या व्रताची पूर्तता झाली.माझे जीवन सार्थकी लागले.

ठाणे जिल्ह्यातील लोकनेते अण्णासाहेब वर्तक ह्यांचे हे उद्गार त्यांच्या 65 व्या पुण्तिथीच्या वर्षातही प्रेरणादायक असेच वाटतात. अण्णासाहेबांचे सारे जीवन कर्मयोग राष्ट्राभिमान व अध्यात्मशीलता यावर उभे होते. जाज्वल्य निष्ठेने प्रेरित होऊन त्यांनी आपले सारे आयुष्य राष्ट्रोध्दारार्थ वाहिले. ते समाजसुधारक होते. आधुनिक युगातील भारतीय पंरपरेचे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी त्यांनी आदर्श मानले.

शेती सुधारणा, शिक्षणप्रसार, स्त्रियांना समान हक्क, हुंडाबंदी, स्थानिक स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वातंत्र्य संग्रामातील साधना,आदर्श ग्रामराज्याचे स्वप्न नागरिक विकासाची प्रगतीपर पावले.जिल्हा बोर्डाचे आर्थिक संवर्धन स्थानिक स्वराज्याचे प्रभावी कार्य,सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ शक्ति दर्शन कार्य महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. दारुबंदीच्या चळवळी बरोबर अण्णासाहेबांनी आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजा संघटनेचे कार्य हाती घेतले.ठाणे जिल्ह्यातील समाजाचे जीवन मुख्यतः शेती व बागायती ह्यावरच अवलंबून होते.समाजाच्या उन्नतीसाठी 1907 पासून बोर्डी चिंचणी व मुंबई येथील काही सुशिक्षित मंडळींनी प्रयत्न केले त्या प्रयत्नातून बोर्डी येथील ज्ञानवर्धक सभेच्या विद्यमाने 1907 साली चिंचणी येथे बोलावण्यात आलेल्या सो.क्ष.समाजाच्या परिषदेचा जन्म झाला. ही परिषद 27 जानेवारी 1907 रोजी चिंचणी येथील मोरेश्वर लक्ष्मण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. ही परिषद म्हणजे समाजात होऊ घातलेल्या जागृतीचा पहिला हुंकार होता. बोर्डी, चिंचणी, तारापूर शिरगाव वगरे गावांतिल कार्यकर्त्यांनी दिनांक 9 मार्च 1919 रोजी चिंचणी येथे सभा घेऊन संघ स्थापन करण्याचे ठरविले. त्या सर्वांच्या मागे चिंचणीचे परशुराम धर्माजी चुरी,बोर्डीचे आत्मारामपंत सावे आणि विरारचे गोविंद धर्माजी वर्तक ऊर्फ अण्णासाहेब वर्तक हे प्रमुख होते. अण्णासाहेब वर्तकांसारख्या तरुण ध्येयवादी व अत्यंत कार्यक्षम अश्या कार्यकर्त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच स्वयंसेवक मंडळाची स्थापना दिनांक 28 मार्च 1920 रोजी करण्यात आली.परंतु योग्य मार्गदर्शन व संघटना ह्यांच्या अभावी हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत.समाजभूषण आत्मारामपंत सावे ह्यांच्या सल्ल्यावरुन ह्या मंडळींनी अण्णासाहेबांची भेट घेतली.समाज सुधारण्यासाठी अण्णासाहेबांची विचारपूर्वक बनलेली प्रगल्भ मते ऐकून त्यांना ह्या मंडळींकडून अधिक विचारविनिमयासाठी बोर्डी येथे बोलविण्यात आले.बोर्डी येथे झालेल्या ह्या सभेत समाजाच्या उन्नतीसाठी संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला व संघाच्या कार्याच्या दृष्टीने अण्णासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 मार्च 1920 रोजी प्रथमच स्वयंसेवक मंडळाची स्थापना करण्यात आली. स्वयंसेवक मंडळाच्या सदस्यांनी गावागावातून दौरे काढले, व्याख्याने दिली व लोकजागृती केली. दिनांक 2 मे 1921 रोजी वसई येथे समाजाची परिषद भरविण्यात आली. समाजाची सर्वांगिण उन्नती घडवून आणण्याचे अण्णासाहेबांचे स्वप्न होते ह्या ध्येयाची मुहूर्तमेढ वसई येथील ह्या परिषदेत संघाच्या स्थापनेत रोवली जात होती.संघाची घटना हातात घेऊन अण्णासाहेब व्यासपिठावर उभे राहिले. त्यांचा प्रफुल्ल चेहरा आनंदाने उजळून गेला होता.आपले एक जिवीत स्वप्न साकार होत आहे ही भावना त्यांच्या शब्दाशब्दातून प्रकट होत होती.त्यांनी आपले भाषण संपविले आणि टाळ्यांच्या गजरात संघाच्या घटनेला परिषदेने मान्यता दिली. या घटनेप्रमाणे संघाच्या आश्रयदात्यांची वर्गणी रुपये 500 अशी ठेवण्यात आली.संघाच्या स्थापनेच्या वेळी श्री.भायजी जगू राऊत व अण्णासाहेब संघाचे आश्रयदाते झाले.1920 साली माकुणसार येथे प्राथमिक शाळा काढण्यात आली.या शाळेच्या स्थापनेसाठी अण्णासाहेबांनी आपली शंभर रुपयाची देणगी दिली.माकुणसार येथील शाळागृह बांधण्याकरीता संघाने मदत केली. त्यानंतर चटाळे येथे शाळा सुरु करण्यात आली. पुढे ह्या दोन्ही शाळा जिल्हा स्कूल बोर्डाने आपल्या ताब्यात घेतल्या. दातिवरे येथे शाळेच्या ईमारत फंडासाठी संघाने मदत केली.1922 साली गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना संघाकडून मदत देण्याचा नविन उपाम सुरु केला.1923 साली वार्षिक परीक्षेत पास होणार्या विद्यार्थी व विद्यार्थीनीस पारितोषिके वाटण्याचा उपाम सुरु केला.1921 च्या वसई येथील पहिल्या परिषदेनंतर माहीम व केळवे तेथे दोन परिषदा झाल्या.1924 साली बोर्डी येथे भरलेल्या चौथ्या परिषदेत शेतकी प्रदर्शनाची जोड देण्यात आली. भोर्डी येथे भरलेली ही परिषद संघाच्या इतिहासात चिरस्मरणिय झाली.1928 साली खुंतोडी वसई येथे भेरलेल्या परिषदेत निरनिराळ्या परीक्षेत उत्तीर्ण होणार्या समाजातील मुलींना कपडय़ाच्या रुपाने बक्षिसे वाटण्याचा उपाम संघाने सुरु केला व स्त्री शिक्षणाला अधिक जोराची चालना देण्यात आली.

अण्णासाहेबांनी आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यासाठी संघाला रुपये 1000 ची देणगी दिली.1924 साली समाजभुषण तात्यासाहेब चुरी यांच्या संपादक परिपत्र ‘क्षात्रसेवक ठनावाचे त्रैमासिक सुरु करण्यात आले. अण्णासाहेब संपादक मंडळाचे प्रमुख सदस्य होते.विरार येथे 1931 साली सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची 11 वी परिषद झाली.1031 सालच्या विरार येथील परिषदेच्यावेळी समाजाची दुसरी खानेसुमारी करण्यात आली अण्णासाहेबांना लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाल्याबद्दल ह्या परिषदेत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येऊन प्रेमाची स्मृति म्हणून त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले 1932 साली संघाचा निधी रुपये 22 000 झाला.1935 साली बोर्डी येथे समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन वसतिगृह स्थापण्यात आले.1935 साली चिंचणी येथे झालेल्या संघाच्या पंधराव्या वार्षिक परिषदेचे अण्णासाहेब अध्यक्ष होते.1936 साली ट्रस्टवत कायदेशिररित्या रजिस्टर करुन पुज्य अण्णासाहेब वर्तक श्री.तात्यासाहेब चुरी श्री.आत्मारामपंत सावे,श्री.नारायण भास्करजी म्हात्रे व श्री.बळवंत जगन्नाथ वर्तक ह्यांना संघाचे ट्रस्टी नेमण्यात आले.1940 साली ठाणे जिल्ह्यातील पहिल्या वादळाने समाजातिल गरीब शेतकर्यांचे फार नुकसान झाले. अण्णासाहेबांनी ह्या प्रसंगी संघाला देणगी दिली व त्या देणगीतून बी-भात खरेदी करण्यात येऊन समाजातील गरीब शेतकर्यांना वाटण्यात आले.

1945 साली रौप्य महोत्सवानिमित्त संघाचा निधी एक लाख रुपये जमविण्याचा संकल्प त्यांनी साकार केला. संघाच्या कार्याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली.त्याच ठिकाणी वसई येथील भायजी जगू राऊत ह्यांच्या वाडीत रौप्यमहोत्सव समारंभ दिनांक 12 व 13 मे 1945 रोजी मोठय़ा थाटाने साजरा करण्यात आला. पंचविस वर्षाच्या ह्या काळात सोमवंशी क्षत्रिय समाजाची संघामार्फत स्पृहणिय प्रगती घडवून आणून समाजात राष्ट्रीय बाणा निर्माण करण्यात अण्णासाहेब यशस्वी झाले होते. अण्णासाहेब रौप्यमहोत्सव स्वागत मंडळाचे अध्यक्ष होते.संघाचा रौप्य महोत्सव अण्णासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत रोमहर्षक प्रसंग होता.समाजाची व संघाची ‘समाजदर्शन पुस्तिका प्रसिध्द करण्यातआली.शेती बागायतीचे व कला कौशल्याचे एक अत्यंत प्रेक्षणीय व सुंदर प्रदर्शन भरविण्यात आले होते.

1947 साली स्वातंत्र्यदिनोत्सवाच्या दिनी संघाला अण्णासाहेबांनी रु.1000 ची देणगी दिली.1950 साली येथील अमर हिंद मंडळाच्या जागेत चौकळशी पाचकळशी समाजातील निरनिराळ्या पोटजातीचे एकीकरण करण्याचा उद्देशाने ‘क्षात्रैक्य परिषदेची स्थापना करण्यात आली. अण्णासाहेबांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. 1921 सालच्या मे महिन्यात वसईच्या इतिहास प्रसिध्द किल्ल्याजवळील नारळी बागेत झालेल्या पहिल्या महाराष्ट्र प्रांतिक पिरषदेत महात्मा गांधीना टिळक स्वराज्य फंडासाठी अण्णासाहेबांनी एक हजार रुपयाची देणगी दिली.

1922 च्या डिसेंबर मध्येच गया येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले.1925 मध्ये स्वराज्यपक्षाच्या प्रचारार्थ देशबंधु दास ह्यांनी स्वराज्य विचारसरणीकरीता वसई येथे भेट दिली. अण्णासाहेबांनी ठाणे लिल्हा स्वराज्यपक्षातर्फे त्यांचा भव्य सत्कार करुन त्यांना ठाणे जिल्ह्यातर्फे थैली अर्पण करण्यात आली.1925 मध्ये नवीन महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीची पहिली सभा पालघर येथे भरविण्यात आली.ह्याच सभेत अण्णासाहेब महाराष्ट्र प्रांतिकचे एक खजिनदार म्हणून निवडले गेले.1930 मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रांतिक उपाध्यक्षपदावर निवड झाली.त्याच साली ठाणे जिल्हा लोकलबोर्डाच्या निवडणुका स्वराज्यपक्षातर्फे लढविण्यात येऊन अण्णासाहेब जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणूननिवडून आले. आपल्या खेडेगावात व आपल्या शेतकरी समाजात राहून आपणास जी लोकसेवा करता येईल ती करावयाची हे अण्णासाहेबांचे ध्येय होते. पानवेलीवर संशोधन करण्यासाठी 1929 मध्ये त्यांनी संशोधन केंद्र उघडले व पानवेलीच्या रोगापासून वाचविण्याचे ज्ञान शेतकर्यांना उपलब्ध केले.1932 साली नारळीच्या झाडावर एक प्रकारची कीड पडे व झाडावरील झावळ्या आपोआप सुकु लागत.ह्या रोगासंबंधी शेतकर्यांना माहिती देण्यासाठी त्यांनी किटकशास्त्रज्ञांची नेमणू केली. शेतकी सभेची स्थापना करुन संस्थेचे प्रमुखपद आपणाकडे न घेता त्या पदावर भायजी जगू राऊत ह्यांच्यासारख्या प्रसिध्द शेतकर्याचीपुढारी म्हणून त्यांनी योजना केली.भायजी जगू यांच्या निधनानंतर अण्णासाहेब वसई शेतकी सभेचे अध्यक्ष झाले आणि 1946 साली पहिल्या खेर मंत्रीमंडळाचे स्थानिक स्वराज्य मंत्री पदावर स्थानापन्न होईपर्यंत म्हणजेच जवळजवळ 11 वर्षे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

1929 मध्ये वसई तालुक्यातील धारावाड विरुध्द अण्णासाहेबांनी संघटीतरित्या जी मोठी चळवळ केली तिला ठाणे जिल्ह्यात इतिहासात फार मोठे स्थान आहे.सरकारी धार्यात रुपयास कधी दोन आणे व कधी तीन याप्रमाणे सूट मिळाली जिल्ह्याच्या आरोग्याच्यादृष्टीने ऐन हंगामात हिवतापाने बेजार झालेल्या शेतकर्यासाठी त्यांनी दवाखाने उघडून औषोधोपचाराची व्यवस्था केली. 1927 साली वसई तालुक्याच्या बंदरपट्टीतील भागावर एक नविन संकट येऊ घातले होते.बी.ऍन्ड ची.आय.रेल्वेने या भागातील लोकांच्या सोयीसाठी वसई रेल्वे पुलाच्या उत्तरेकडील उमेळे गावापासून विरार पर्यंत रेल्वेचा एक फाटा बंदर पट्टीच्या भागातून काढण्याची एक योजना आखली होती.रेल्वेने आखणी केलेला मार्ग वसई आगराच्या अत्यंत सुपिक व समृध्द अश्या भागातून जात होता.त्यामुळे शेकडो एकर बागायतीजमिन रेल्वे मार्गाखाली जाणार होती.ऐवढेच नव्हे तर हा मार्ग ज्या बागायती वाडय़ांतून जाणार होता त्या वाडय़ांतील अनेक लोकांची घरेदारे जाऊन ह्या मार्गामुळे त्या वाडय़ांची चमत्कारीक विभागणी होणार होती कि रेल्वेसाठी केलेल्या मार्गाशिवाय बाकी राहिलेल्या लहान लहान तुकडय़ाचाही लागवडीच्यादृष्टीने उपयोग होणार नव्हता. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी मोठी चळवळ उभारुन योजना कायमची रद्द केली.

उत्तर कोकणात म्हणजे ठाणे जिल्हा,पूर्वीचा मुंबई उपनगर जिल्हा व कुलाबा जिल्हा म्हणून होणार्या विभागात असून तीला खार जमिन असे म्हणतात.रंगाने लाल -राता तांदुळ त्यांनी ह्या खार जमिनीत पिकविला. शेतकर्याच्या प्रत्येक प्रश्नात त्यांनी लक्ष घालून शेतकर्यांसंबंधी अण्णासाहेबांनी जी आस्था दाखविली व वसई तालुक्यातील धारावाढी विरु जाटोची चळवळ करुन शेतकरी वर्गात त्यांनी जी मोठी जागृती निर्माण केली,त्यामुळे ते ठाणे जिल्ह्यातील शेतकर्याचे पुढारी म्हणून ओळखले जाऊ लागले.शेतकर्याच्या ह्या स्थानाची सरकारला अण्णासाहेब विषयी जाणीव होती. दिल्ली येथील इंपीरिअल कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्चच्या ‘राईस कमिटीवरठ मुंबई इलाख्यातील भातशेती करणार्या शेतकर्याचे प्रतिनिधी म्हणून मुंबई सरकारने त्यांचे नाव मध्यवर्ती सरकारकडे सुचविले.1936 सालच्या 4 फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षाकरीता अण्णासाहेबांची ‘राईस कमिटीवर ठनेमणूक करण्यात आली. अण्णासाहेबांनी ह्या कमिटीपुढे, उत्तर कोकणातील भातशेतीचे काही प्रश्न ह्या विषयावर एक महत्वाचा प्रबंध वाचला. भातशेतीच्या सुधारणेबाबतीत त्यांनी सतत प्रयत्न केले. ठाणे जिल्ह्याच्या समुद्रालगतच्या पश्चिम भागात दिनांक 16 ऑक्टोबर 1940 रोजी एक भयंकर वादळ झाले. शेतकर्याप्रमाणेच समुद्रानजीक रहाणारे मच्छीमार लोकही उघडे पडले. ठाणे जिल्ह्यातील आपतग्रस्तांच्या साहाय्यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वादळ संकट निवारण समितीकडून चाळीस हजाराची मदत मिळाली. त्यातच लोकल बोर्डाचे अध्यक्ष अण्णासाहेब ह्यांनी भर घालून आपादग्रस्तांना आर्थिक सहाय्य केले. किल्ले वसई द्विशत सावंत्ससरिक विजयदिनोत्सवानिमित्त रणसंग्रामाच्या धारातीर्त पतन पावलेल्या वीराच्या पुण्यस्मरणार्थ दिनांक 12 व 13 मे 1939 रोजी वसई किल्यात विजयोत्सव साजरा करण्यात आला.स्वागत समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने अण्णासाहेबांनी उत्सव अपूर्व उत्साहाने पार पाडण्यास सहाय्य केले. अशा ह्या सरस्वती पुत्र अण्णासाहेबांची जीवनज्योत दिनांक 14 जुलै 1953 रोजी मालवली.त्यांच्या पवित्रस्मृतीस शतशः प्रणाम !

Content credit – http://www.allaboutvasaivirar.com/news/annasaheb-vartak-honor/

2 thoughts on “लोकनेते अण्णासाहेब वर्तक

  1. शब्दांत बांधता न येणारे अचाट कार्य मा. अण्णासाहेबांनी केले आणि समाजाला एकत्र बांधुन ठेवले . 👌

    1. खरी गोष्ट आहे….त्याच कार्याला मानाचा मुजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *