🔴
सुवर्णकन्या हिमा दास..
** काय धावलीस तू हिमा !! शेवटच्या 100 मी. मध्ये तुझा ग्रेस पाहण्यासारखा होता. तेव्हा तू धावत नव्हे तर झेपावत होतीस. वाऱ्याच्या नव्हे तर प्रकाशाच्या वेगाने धावलीस तू !!.. अप्रतिम..!! तो क्षण नजर आणि श्वास दोन्ही रोखून मी तुला पाहत होतो. तू फिनिश लाईन क्रॉस केलीस आणि आपोआप श्वासांनी एक जोरदार उसासा टाकला. टाळया आपसूक वाजल्या. “WOW” ही तर प्रतिक्षिप्त क्रियाच झाली. पण नजर काही तुझ्यावरून हटत नव्हती. ती तेव्हाच सरली जेव्हा पाठीवरून आपला राष्ट्रध्वज घेऊन तू प्रेक्षकांची शाब्बासकी मिळवत होतीस. त्याच क्षणी माझ्या डोळ्यात अभिमानाचे आनंदाश्रू तराळले आणि मगच तुझ्यावरून नजर सरली..
ऊर भरून आला जेव्हा तुझ्यासारखी सुवर्णकन्या गोल्ड मेडल पोडीयम वर उभी राहून गोल्ड मेडल घेत होतीस. कंठ दाटून आला अभिमानाने जेव्हा तू अटकेपार झेंडा रोवलास. आपले राष्ट्रगीत चालू झाले आणि तुझ्या डोळ्यातून ओघळलेले अभिमानाचे अश्रू पाहून गर्वाने माझी छाती फुलून गेली होती. देशाभिमान पुन्हा जागा झाला होता. रोमारोमात स्फुर्ती संचारली..पुन्हा पुन्हा हे असे क्षण यावे हीच इच्छा… राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतामधे काय जादू आहे ना !!!!
हिमा !! तो दिवस नक्कीच दूर नाही. ऑलिम्पिक तुला खुणावतोय…. तुझ्या मेहेनतीला आणि समर्पणाला कडक सलाम.. तुझ्या आनंदाश्रू सकट आपला राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत पुन्हा आम्हा भारतीयांना पाहायचा-ऐकायचा आहे..
तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुला ज्यांनी ज्यांनी मोलाची साथ प्रोत्साहन दिले त्यांना खरोखर सलाम.. एका उभरत्या खेळाडूला किती पायऱ्या ,खाच खळग्यांना ओलांडून वर यावे लावते याची कल्पना सर्वांना नसते.. तुझ्या उज्वल भविष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा..😊🙇🏻
– *नंदन वर्तक.*