आपली भाषा टिकावी असे अनेकांना वाटते. वाडवळ समाजही याला अपवाद नाही. मात्र अनेकदा भाषा टिकावी यासाठी जे शास्त्रीय प्रयत्न करावे लागतात ते तसे होताना दिसत नाहीत. बहुतेक वेळा आपली भाषा टिकवण्याची कल्पना म्हणजे भाषेतील शब्दांचा संग्रह काढणे किंवा जास्तीत जास्त भाषेचा शब्दकोश तयार करणे यापलिकडे जाताना दिसत नाही. यासाठी कुणालाही दोष देता येणार नाही. कारण आपल्या भारतात अत्यंत प्राचीन काळी जे भाषाविज्ञान अभ्यासले आत होते, ज्या योगे पाणिनी आणि भर्तृहरी यांनी अनेक सिद्धान्त मांडले ते भाषाविज्ञान अलिकडे समाजात फारसे लोकप्रिय दिसत नाही. अनेक शिकल्या सवरलेल्यांनाही लिंग्विस्टीक्स म्हणजे काय हे माहित नसते. तेव्हा इतरांची काय कथा? त्यामुळे भाषा टिकावी असे वाटत असल्यास त्या भाषेचे स्वर, व्यंजन, त्या भाषेतील शब्दांची बांधणी, त्यामध्ये दिसणारे आकृतीबंध, त्या भाषेचे व्याकरण, त्या भाषेतील नाम, सर्वनाम, विशेषणे, क्रियापदे, क्रियाविशेषणे इत्यादींची वैशिष्ट्ये, त्या भाषेत कालानूरुप घडत गेलेले बदल आणि तदानुषंगिक अनेक गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते.
या दिशेने म्हणजेच लिंग्विस्टीक्सच्या मार्गाने वाडवळीचा अभ्यास करावा असा एक विचार माझ्या मनात आहे. हे काम फार मोठे आणि वेळ घेणारे आहे. त्यात अनेकांचे सहकार्य आवश्यक आहे. वाडवळीचे काम हे मोठे आहे म्हणण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ही भाषा सर्व वाडवळ समाज बोलत असला तरी गावागणिक या भाषेत फरक पडताना आढळतो. वसईच्या वाडवळीत पोर्तुगीज शब्द जास्त आढळतात तर आमच्या तारापूर चिंचणीच्या वाडवळीवर गुजरातीचा प्रभाव जाणवतो. स्थूल मानाने विरार वसई, माकुणसार दातिवरे, केळवे माहीम, तारापूर चिंचणी आणि बोर्डी असे विभाग केले तर या भागांमध्ये बोलल्या जाणाच्या वाडवळीत काहीएक फरक निश्चितपणे जाणवतो. वाडवळीचा भाषाविज्ञानाच्या अंगाने अभ्यास करायचा झाल्यास हे बदल लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. अशा अनेक गोष्टींचा या अभ्यासात विचार करावा लागेल.
डॉ. अतुल ठाकुर